पुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार पडणार.. - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Monday, 30 August 2021

पुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार पडणार..

पुणे मेट्रोची भन्नाट योजना; पुणेकरांसाठी धावत्या मेट्रोतही लग्न, वाढदिवस, साखरपुडा सोहळा पार पडणार..

पुणे :- पुणेकरांना आता लवकरच मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. त्यामुळे, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होईल. विशेष म्हणजे या मेट्रोत पुणकरांना वाढदिवस, लग्न, साखरपुडा यांसारखे कार्यक्रमही साजरे करता येणार आहेत.

कौटुंबिक सोहळा असो किंवा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचा म्हटलं की, हॉलपासून सगळ नियोजन करावं लागतं. मात्र, मेट्रोचा डब्बाच तुमच्यासाठी हॉल असेल तर. भन्नाट कल्पना आहे ना ही, धावत्या मेट्रोत तुमचं लग्न किंवा वाढदिवस साजरा केला तर तो संस्मरणीय ठरणार हे नक्की. लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा विवाहाचा वाढदिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रोचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे अल्प शुल्कात पुणेकरांना हे मंगलसोहळे धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहेत.

पुण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय दरम्यान डिसेंबर अखेर ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रो लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देणार आहे. त्यामुळे, आपल्या मंगलसोहळ्याचा आनंद द्विगुणीत होईल. अर्थातच, हा सोहळाही एका कायमची आठवण बनून स्मरणात राहिल.

या सोहळ्यांना कोणाला मिळेल परवानगी ?

● विवाहाची बोलणी

● साखरपुडा 

● विवाह सोहळा

● विवाहाचा वाढदिवस

● लहान मुलांचे व ज्येष्ठांचे वाढदिवस 

● खर्च सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी असणार

सध्या नागपूर मेट्रोमध्येही अशा प्रकारचे अभिनव उपक्रम साजरे होतात. पुण्यातही तीस स्थानकांत हे उपक्रम, सोहळे राबविण्याचे नियोजन असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages